fbpx

मुंबईमध्ये धक्कादायक घटना, क्रिकेटपटूची निघृण हत्या

टीम महाराष्ट्र देशा :  मुंबईमध्ये गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. भांडूपमधल्या एका तरुण क्रिकेटपटूची तिघांनी हत्या केली आहे. राकेश पवार असं मृत क्रिकेटपटूचं नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राकेश पवार हा गुरुवारी रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. वाटेत ३ जणांनी त्याला काहीतरी कारण काढून थांबवलं. अडवणारे तीनही जण राकेशच्या ओळखीचेच असल्याची माहिती आहे. या तीन जणांनी चाकूने भोसकून राकेशची हत्या केल्याची माहिती आहे. तीनही अज्ञात आरोपी राकेशची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

क्रिकेटपटूच्या हत्येनंतर भांडूपमध्ये खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जुन्या वादातूनच हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.याप्रकरणी पोलिसांनी राकेश पवार याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

दरम्यान राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत होता. पूर्ववैमनस्यातून राकेशची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र राकेशच्या हत्येचं नेमकं कारण आणि आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.