शाहरुखच्या मुलाला अडकवून देशात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचे काम; नाना पटोलेंचा आरोप

शाहरुखच्या मुलाला अडकवून देशात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचे काम; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना एनसीबीने अटक केली आहे. न्यायालयाने आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या प्रकरणावरुन एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्यन खानच्या अटकेवरुन भाजपवर गंभीर आरोप केलाय. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

एनसीबीने केलेली कारवाई ही भाजपच्या सांगण्यावरुन करण्यात आली आहे. ज्या क्लिप आहेत, त्यावेळचं जे व्हिडीओ फुटेज आहे. ते अजूनही यांनी प्रकाशित केलं नाही, त्याची माहिती दिली नाही. ते कोण लोक होते, त्यांनी शाहरुखच्या मुलाला अडकवण्यासाठी केलेला हा प्रयोग, देशात पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करुन राजकीय पोळ्या शेकता येतात का? त्यासाठी केलेलं हे प्रकरण होतं का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, शाहरुखच्या मुलाच्या विरोधात हे षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या