घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!

औरंगाबाद : देशात कोरोनाची दुसरी लाट असली तरी तिसऱ्या लाटेची भीती आतापासूनच वाटत आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात म्हणजेच घाटीतही बालकांसाठी ४५ बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना खेळण्यासाठी खोलीही तयार करण्यात येत आहे. मात्र, पालकांनी कोरोना नियमांचे पालन केले तर या बेडचा वापर करण्याची वेळच येणार नाही.

खबरदारीचा उपाय म्हणून घाटीतील वार्ड क्रमांक २६ मध्ये २० बेडचे आयसीयू आणि २५ बेड्स असे ४५ बेड राखीव करण्यात आले आहेत. त्यामुळे ४५ कोरोना झालेल्या बालकांवर घाटीत उपचार करण्यात येतील. या वार्डात लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र रुम तयार करण्यात येणार आहे. यात व्हेंटिलेटरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील इतरही ठिकाणी लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. यात बालरोग तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे.

या सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना पालकांनीच व्यवस्थित सांभाळले तर ही वेळच येणार नाही. कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्यात ‘ब्रेक द चेन’ची नियमावली लावण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन झाल्यास कोरोनाची चेन तुटण्यास मदत होईल. त्यामुळे लहान मुलांवरील कोरोनाचा धोकाही कमी होईल. त्यामुळे पालकांनी काळजी घेतली तर मुलेही या पासून दूर राहतील.

महत्त्वाच्या बातम्या