हस्तकलेने नटलेल्या दहीहंडींचा बाजारात जोर

पुणे :  दहीहंडी उत्सवासाठी लागणार्‍या विविध साहित्यांनी आणि रंगीबेरंगी, नक्षीदार दहीहंडी मडक्यांनी बाजारपेठ फुलली आहे. दुसरीकडे न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत असलेले निर्बंध उठविल्याने मोठ्या उंचीच्या दहीहंड्या पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. उंचीचे निर्बंध उठल्याने गोविंदा पथकांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. असे असले तरी न्यायालयाचे इतर नियम पाळण्याच्या सूचना मंडळांना पोलिसांनी दिल्या आहेत.शहराची मुख्य बाजारपेठ आसलेल्या महात्मा फुले मंडई परिसरातील दुकानांमध्ये दहीहंडी उत्सवासाठी रंगीबेरंगी दहीहंडी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये पिवळ्या रंगामध्ये विविध रंगाचे नक्षी आणि श्रीकृष्णाच्या प्रतिकृती हंड्यांवर तयार केल्या आहेत. मोठ्या हड्यांसोबतच त्यावर ठेवल्या जाणार्‍या लहान हंड्यांमध्येही विविध प्रकार आहेत. त्याचबरोबर उत्सवासाठी लागणारे नारळ, विड्याची पाने, दोरी, ज्वारीच्या लाह्या, विविध फळे, शिंकाळे, हळद-कुंकू, बत्ताशे, गुलाल, बुक्का, मध, नाडा, अत्तर, अगरबत्ती, कापूर, बनावट नोटांच्या माळा, झुरमूळे, फुगे, हार, पताके आदी साहित्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. दूध आणि दही हे नाशवंत पदार्थ असल्याने दहीहंडीच्या दिवशीच ते खरेदी केले जातात. हस्तकला असलेल्या दहीहंड्या रमेश परदेशी आणि विक्रांत परदेशी, इब्राहीम युसुफ कुंभार, सायरा कुंभार यांनी कापड, विविध आकाराचे आरसे, लेस, जर, जीक, विविध रंगाचे लहान मोठे मनी आदी साहित्य वापरून हस्तकलेद्वारे दहीहंडी तयार केल्या आहेत. या हंड्यांना त्यांनी तिरूपती कलश, कृष्ण कलश, राधा कलश अशी नावे दिली आहेत. लहान मुलांसाठी पेंद्या हंडी तयार केल्या आहेत. गोविंदा पथकांनी नियमांचे पालन करावे. दहीहंडीच्या उंचीसंदर्भात असलेले निर्बंध न्यायालयाने उठवले असले तरी गोविंदांच्या वयासंबंधी आणि ध्वनी प्रदूषणासंबंधी असलेल्या नियमांसह इतर नियमांचे पालन गोविंदा पथकांनी आणि दहीहंडी मंडळांनी करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.