अहमदनगरमध्ये भाकप व किसान सभेच्या वतीने कांदा निर्यात बंदीचा निषेध!

kanta niryat bandi

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला. तर कांदा निर्यात बंदीच्या परिपत्रकाची होळी करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळणार असून, याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात ॲड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ.भैरवनाथ वाकळे, दीपक शिरसाट, तुषार सोनवणे, कार्तिक पासलकर सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या:-