कर्वे शिक्षण संस्थेतिल विद्यार्थ्यांना न्यायालयामार्फत नोटीस

पुणे : कर्वे शिक्षण संस्थेत गेल्या २० दिवसापासून वसतिगृह पुन्हा मिळावे म्हणून विद्यार्थी निषेध आंदोलन करत आहेत. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’च्या विद्यार्थ्यांचे दिवसरात्र सुरू असून, त्यांनी आपल्या मागणीसाठी कॉलेजच्या आवारातच तंबूंमध्ये ठिय्या ठोकला आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचा आवाज आवाज दबण्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये बेकायदा पद्धतीने राहत आहात’ अशी न्यायालयाची नोटीसच विद्यार्थ्यांना न्यायालयामार्फत पाठवली आहे. त्यामुळे समाजसेवेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे.

तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांची काळजी घेण्याबाबत कॉलेजला काहीच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलेजच्या वसतिगृहात द्वितीय वर्षाचे १६ विद्यार्थी राहायला आहेत. या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना वसतिगृह शुल्क म्हणून २१ हजार रुपये घेण्यात आले आहेत.

तरीदेखील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी काही कारण दाखवून वसतिगृह खाली करायला लावले आणि त्यांची सोय दोन सदनिकांमध्ये करण्यात आली. सदनिकांमध्ये सोयीसुविधा आणि सुरक्षा नसल्याने विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची मागणी कॉलेज प्रशासनाला केली. मात्र, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्याला मनाई केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कॉलेजचे संचालक आणि व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीला संचालक आणि अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

आधी वारजे पोलीसांकडून आता न्यायालयाकडून नोटिस देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी देखील वसतिगृह मिळवणारच असा निर्धार केला आहे. कॉलेजच्या आवारातच तंबू ठोकून ठिय्या मांडला आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना न्यायालयाने गुरूवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थी अनधिकृतपणे कॉलेजच्या आवारात राहत आहेत. त्यांचे आंदोलन हे बेकायदा असून त्यांनी कॉलेजच्या जागेवर आपला ठिय्या मांडला आहे.

त्यामुळे कॉलेजमधील नियमित क्लासेस होण्याला अडथळा होत आहे. हे विद्यार्थी एकप्रकारे कॉलेजच्या आवारात भीती निर्माण करण्याचा प्रकार करत अएसल्याने या विद्यार्थ्यांना असे करण्यापासून रोखा, अशी तक्रार कॉलेजने न्यायालयाकडे केली आहे. त्यानुसार न्यायालयामध्ये विद्यार्थी हजर झाले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ सप्टेंबरला होणार आहे. कॉलेजच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.