fbpx

न्यायालयाचे काम लवकर सुरु होणार; आमदार लांडगे यांची नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे होणा-या प्रशस्त न्यायालयाचे काम लवकरच सुरु होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भूमिका सकारात्मक आहे. या न्यायालयाची 10 मजली इमारत होणार असून त्यापैकी चार मजल्यांचे काम लवकरच सुरु होणार आहे. अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनात आमदार लांडगे यांनी मोशी येथील प्रलंबित न्यायालयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज (गुरुवारी) मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आमदार लांडगे, पिंपरीचे आमदार गौतम चाबूकस्वार, विधि विभाग सचिव जमादार, पिंपरी बार काउन्सिल असोसीएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. किरण पवार, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. अतिश लांडगे, अॅड. तुकाराम पाटील, अॅड. प्रसन्न लोखंडे, अॅड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते.

महेश लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणा-या न्यायालयासाठी मोशी येथे जागा मिळाली आहे. अतिक्रमण होऊ नये, यासाठी त्या जागेभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे. हे न्यायालय दहा मजली होणार आहे. न्यायालयाच्या कामासाठी मागील चार वर्षांपासून केवळ चर्चा सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामाला प्राथमिकता देत चार मजल्यांचे काम तात्काळ सुरु करावे. यामध्ये वकिलांसाठी एक स्वतंत्र चेंबर आणि कॉन्फरन्स हॉल बांधण्यात यावा. या कामासाठी त्वरित निधी मंजूर करून कामाचे लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.

आमदार लांडगे यांच्या मागणीबाबत सविस्तर प्रस्ताव संबंधितांकडून मागवून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच नवीन न्यायालयाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

 

वारक-यांनी दिली महेश लांडगे यांच्या कामाची पावती