हिंदू दहशतवादाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांना न्यायालयाचा दिलासा

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप होताना पहायला मिळाले. अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील पहायला मिळाली मात्र सर्वाधिक चर्चेत राहिले ते मक्कल नीधी मयमपक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हसन. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने खळबळ उडवून दिली होती.

कमल हासन यांनी नथुराम गोडसेविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून हिंदू मुन्नानी पक्षाने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्यात हसन यांना दिलासा मिळाला असून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कमल हसन यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

तामिळनाडूतील अरवाकुरुची विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलताना कमल हासन म्हणाले होते की. ‘सभेत मुस्लिम लोक आहेत म्हणून मी हे बोलत नाही. इथे महात्मा गांधींचा पुतळा आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. नथुराम गोडसे त्याचे नाव आहे,’ त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अनेकांनी कमल हसन यांच्यावर टीका केली होती.