भाजप सहयोगी खासदार संजय काकडेवर गुन्हा दाखल करा; न्यायालयाचे आदेश

पुणे: भाजपचे सहयोगी खासदार आणि सध्या पुण्यामध्ये कारभारी बनू पाहणारे संजय काकडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. न्यू कोपरे गावातील स्थानिकांची जमीन बळकावत त्याची फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता काकडे यांच्यासह बंधू सूर्यकांत काकडे तसेच इतर संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

संजय काकडे यांचे भाऊ सुर्यकांत काकडे यांना न्यू कोपरे ग्रामस्थांनी 14 एकर जमीन विकसनासाठी दिली होती. मात्र जमिनीच्या कागदपत्रात खाडाखोड करून एकूण 38 एकर जमीन घेण्यात आली. त्यातील सात एकर जमीन महापालिकेला "ऍमिनीटी स्पेस’ म्हणून.. तर बाकीची म्हणजेच गावकऱ्यांच्या मालकीची 17 एकर जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या विरोधात न्यू कोपरे ग्रामस्थांकडून लढा उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काकडे यांच्या घरा समोर युक्रांदच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. आता स्थानिक नागरीक दिलीप मोरे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिवाजीनगरच्या प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात गावकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

You might also like
Comments
Loading...