जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद

मुंबई – जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे उद्घाटन दिनांक १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळू शकते. १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेत राज्य शासनाच्या कृषी व ग्रामीण पर्यटन विभागाचे अधिकारी, बँकांचे अधिकारी तसेच कृषी पर्यटन केंद्र चालकांचे मार्गदर्शन उपस्थितांना मिळणार आहे. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे समन्वयक पांडुरंग तावरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि कृषी पर्यटन विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतीला पूरक व्यवसायाची जोड असल्याशिवाय पुढच्या काळात पारंपरिक शेती परवडणारी नाही. भविष्यात जसजसे शहरीकरण होईल तसतसे शहरातील पर्यटकांचा कृषी पर्यटन केंद्रांवर ओघ वाढणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कृषी पर्यटनाला वाव आहे. परिषदेत कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठीची माहिती तसेच राज्य शासनाने जाहीर केलेले कृषी पर्यटन धोरण विषद करण्यात येणार आहे.

Loading...