पुण्यातील बड्या हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार, रुग्णाच्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे

cotton-with-blood-found-in-patient-soup-in-jahangir-hospital-pune

पुणे: पुण्यातील नामांकित जहांगीर हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णाच्या सुपात रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले आहेत. त्यामुळे जहांगीर हॉस्पिटलचा निष्कळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रुग्णाच्या परिवाराकडून हॉस्पिटल विरोधात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील महेश सातपुते यांच्या पत्नी बाळंतपणासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या, प्रसूतीनंतर काही काळानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्ण महिलेला सूप देण्यात आले होते. यावेळी थोडं सूप पिल्यानंतर रुग्ण महिलेला सुपामध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या महेश सातपुते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, या धक्कादायक प्रकाराबाबत रुग्णालयाशी संपर्क साधला असता, हे सर्व नेमक कुणी केल हे सांगता येणार नाही, मात्र रुग्णालय प्रशासनाकडून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असं रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी आरती इराणी यांनी सांगितले आहे. या पूर्वी देखील जहांगीर हॉस्पिटलमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत.