कामगारांसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात भ्रष्टाचार; सीबीआयमार्फत चौकशी करा – अजित पवार

ajit pawar

नागपूर – राज्यात बांधकाम कामगार मंडळाच्या नावाने असलेल्या ८ ते ९ कोटींच्या ठेवींवर डल्ला मारण्याचे काम सुरु असून कामगारांसाठी सेफ्टी किट, एसेनशियल किट आणि मिड डे मील खरेदी करण्यासाठी टेंडर काढले गेले होते मात्र यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून यात मोठया मंत्र्यांचा वरदहस्त आहे का ? अशी आम्हाला शंका आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात करत एकच खळबळ उडवून दिली.

सध्या राज्यात बांधकाम कामगारांच्या ठेवींवर डल्ला मारायचं काम सुरू आहे. राज्यात बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले गेले आहे. या मंडळाअंतर्गत ५ लाख ४० हजार कामगार नोंदणीकृत आहेत. या मंडळाच्या नावाने ८ ते ९ हजार कोटींच्या ठेवी असून या सर्व ठेवी बांधकाम कामगारांच्या ठेवी आहेत.

या कामगारांसाठी सेफ्टी कीट, एसेनशीयल कीट आणि मिड डे मीलसाठी २ ते २.५ हजार कोटींचे टेंडर काढलं गेले. या सेफ्टी किट, एसेनशीयल किटची किंमत बाजारात २ हजार ते ५ ते सव्वा पाच हजार किंमत देवून टेंडर काढले गेले आणि हे काम ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या कंपनीला दिले गेले असा गंभीर आरोपही अजितदादांनी केला.

हे साहित्य विकत घेण्यापेक्षा थेट कामगारांच्या खात्यात पैसे द्यायला हवे होते. हा मोठा घोटाळा असून खरेदी समितीला डावलून या साहित्याची खरेदी करण्यात आली. या कंपन्यांवर सीबीआयने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला तरी अशा कंपन्यांना टेंडर देण्यात आले असा आरोप करतानाच खरेदी केलेल्या साहित्यांच्या बाजारभावात आणि साहित्य खरेदी केल्याच्या भावात मोठी तफावत असल्याने याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली.