भ्रष्टाचाराने बरबटलेले लोकचं आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे. पण भ्रष्टाचाराने बरबटलेले लोकच त्यांच्या पाया पडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे निमित्त जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे आयोजित मेळाव्यात जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला.

यावेळी पाटील म्हणाले की, राज्य आणि देशाची एकूणच आर्थिक परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत राज्यात शेतकरी आत्महत्या करत होता, पण भविष्यात रोजगार गेल्यामुळे कामगारांच्या देखील आत्महत्या वाढतील असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. गेल्या 45 वर्षानंतर सर्वाधिक बेरोजगारी या सरकारच्या काळात वाढणार असल्याची टिका देखील पाटील यांनी केली.

राज्यातील अनेक उद्योग आज संकटात आहे. पारले कंपनीने 10 हजार कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे, ऑटो इंडस्ट्रीने आपले उत्पादन घटवले आहे, बीएसएनल, एमटीएनएल सारख्या सरकारी कंपन्या डबघाईस आणून अंबानी यांच्या जिओ कंपनीला फायदा पोचवण्याचे काम सुरू आहे. असल्याची टिका पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादीला निवडणुकी आधीच धक्के बसत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आ. दिलीप सोपल यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत दिलीप सोपल यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघ देखील कॉंग्रेस आघाडीच्या हातातून गेला असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या