VIDEO: व्हिडीओ व्हायरल होताच लाचखोर पोलिस निलंबीत

नागपूर : वाहतूक नियमाचे उल्लघन करणा-याकडून २०० रुपयांची लाच घेणे नागपुरातील एका वाहतूक पोलिसाला चांगलेच अंगलट आले आहे. लाच घेतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायर झाला. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांना त्याला तडकाफडकी निलंबित केले. भुजंगराव थाटे असे या पोलिसाचे नाव असून तो वाहतूक शाखेच्या चेंबर-3 मध्ये कार्यरत होता.

यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमत्त 26 जानेवारी रोजी शहरातील सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसरभवन चौकात थाटेची तैनाती करण्यात आली होती. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सहका-यांनी सिग्नल तोडून जाणा-या दुचाकीला अडवले आणि शेजारी तंबूत बसलेल्या थाटेकडे नेले. यावेळी थाटेने दुचाकीस्वाराला 1200 रुपयांचे चालान बनवण्याचा धाक दाखवला. तसेच चालान पावती हातात घेऊन दंड भरण्याची हुल दिली. यावेळी दुचाकी स्वाराने प्रकरण येथेच संपवण्याची विनंती केली असता, थाटेने त्याच्याकडे 300 रुपये मागितले. त्यावर दुचाकी स्वाराने आपल्याकडे 200 रुपये असल्याचे सांगत ते थाटेला दिले. हे पैसे थाटेने आपल्या खिशात टाकले. तसेच चालान न घेता सोडून देण्याबद्दल 200 रुपये घेतल्याचे त्याने मान्य केले.

हा संपूर्ण प्रकार सदर वाहनचालकासोबत असलेल्या कुणीतरी चित्रीत करून आज, शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल केला.या घटनेचा व्हिडीओ पत्रकारांच्या व्हॉटस्अप ग्रुपवर आणि तेथून वाहतूक पोलिस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर परदेशी यांनी तत्काळ कारवाई करून थाटे याला तडकाफडकी निलंबित केले.

पहा या लाचखोर पोलिसाचा प्रताप !