भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना काँग्रेसची उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसने आणखी दहा उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत कार्ती यांचा शिवगंगा मतदारसंघामध्येच पराभव झाला होता.दरम्यान, या नव्या यादीत कर्नाटकमधील दक्षिण बेंगळुरु येथून बी.के.हरिप्रसाद यांना तर महाराष्ट्रातील अकोलामधून हिदायत पटेल यांना, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमधील नियोजनशून्यता आणि अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली आहे.