‘कुणी विचारलं तर त्यांना सांगा माझा फोन आला होता’, शेतकऱ्यांची अडचण अजितदादांनी फोनवरूनच केली दूर

ajit pawar

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त बाकिच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम शेतकऱ्यांच्या कामावर देखील झाला आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना पेट्रोल-डीझेल देण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशाचं एका शेतकऱ्याने खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवारांना फोन करून आपली अडचण सांगितली आहे. आणि अजित पवारांनी देखील फोन वरूनच सर्व शेतकऱ्यांना पेट्रोल देण्याचे आदेश देले आहेत.

अजित पवारांची ही ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये अजित पवार असे म्हणतात की, सगळ्यांना पेट्रोल – डीझेल द्यायला सुरुवात करा. आत्ताच आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. शेतकऱ्यांना लागेल तेवढं पेट्रोल डिझेल द्यायचं. एसपी, कलेक्टर सगळ्यांना सांगितलं आहे, तुम्ही द्या. कुणी काही केलं तर मला फोन करा, मी आहे मुंबईत. शेतकऱ्यांची तोडणीची वैगेरे कामं आहेत ती अडता कामा नयेत. मी सांगतोय म्हणून द्या. कुणी विचारलं का सुरु केलं तर त्यांना सांगा अजित पवारांचा फोन आला होता.

दरम्यान राज्यात सध्य़ा करोनाने थैमान घातला असल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात लॉक़डाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर त्याआधीच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. दरम्यान ग्रामीण भागातील शेतीची कामं अडून येत यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पेट्रोल, डिझेल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण येताना दिसत आहे.