मोबाइल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करा; अन्यथा…

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू विकण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये रहावे लागेल म्हणूनच मोबाईलचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी इंडिया सेल्यूलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने थेट पंतप्रधान मोदींकडेही केली आहे.

याबाबत आयसीईएने पंतप्रधान मोदींबरोबरच व्यापारी महासंघासोबत केंद्रीय गृहमंत्रालय, गृह सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून मोबाइल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी आयसीईएने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं की, ‘देशामधील अडीच कोटी जनतेच्या मोबाईल फोनमध्ये थोड्या प्रमाणात तक्रारी असून लॉकडाउनमुळे पुरवठा साखळीला फटका बसल्याने हे मोबाईल दुरुस्त करण्यासाठी लागणारे सामान उपलब्ध नसणे, मोबाईल दुरुस्तीची दुकाने बंद असणे, अशा अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे’.

दरम्यान, या काळात फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. ही बंदी अशीच कायम राहिल्यास मे महिना संपेपर्यंत देशातील चार कोटी मोबाईल युझर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील, असं इंडिया सेल्यूलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्सअसोसिएशनने (आयसीईएने)  म्हटलं आहे.