सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत?

uddhav thackeray

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.

नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान,कोरोना काळात राज्याच्या आरोग्य विभागाचा भर डोक्यावर घेत धावपळ करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.३-४ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

त्याआधी राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती.आता ते तिसऱ्यांदा कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील नुकतीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री असे अचानक कोरोना ग्रस्त होऊ लागल्याने अनेकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. दरम्यान,मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

“अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला.

महत्वाच्या बातम्या