सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतही आता झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे.

आंबावाडीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर दहिसरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचे ढग अगदी गडद होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईतील दहिसरमध्ये कोराना बाधीत रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. ज्या विभागात हे रुग्ण आढळलेत तो विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दहिसरमधल्या झोपडपट्टीतही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबईतील झोपडपट्टीत आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

दहिसर इथल्या दाटीवाटीच्या अंबावाडी झोपडपट्टीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.  कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर गर्दी टाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्स पाळणे हा मोठा पर्याय आहे. त्यासाठी संपूर्ण भरतासह मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे.