कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार, ऊर्जामंत्र्यांचे नागपूरकरांना आश्वासन

Nitin Raut

नागपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणींमधील खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारासंदर्भातील औषधांचा साठा, सर्मपित कोविड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या  प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता या सर्व कळीच्या मुद्दय़ांवर तूर्तास मात केल्याचे समाधान आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस प्रशासन व जिल्हा परिषद यामध्ये यापुढेही उत्तम समन्वय ठेवून कोरोना नियंत्रित ठेवण्याचे निर्देश सोमवारी व्हीसीद्वारे दिले. पालकमंत्री सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी सोमवारी मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह मनपा आयुक्त राधाकृष्ण बी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सीईओ योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा शल्यचिकित्सक देवेद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार आदी सहभागी झाले होते.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. आजच्या आढावा बैठकीत गेल्या सात दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे यासंदर्भात नोडल अधिकारी असून ऑक्सिजनची उपलब्धता कायम राहील यासाठीची समिती दररोज या संदर्भात आढावा घेत आहे. सध्या ३५६ व्हेंटिलेटरची उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. मात्र, भविष्यातील कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयातील ही सुविधा वाढविण्याचे निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले असून, यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

सध्याच्या उपलब्ध आरोग्य व्यवस्थेला जोड म्हणून मनपाचे आणखी चार हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कोरोना रुग्णांच्या सेवेत पुढील आठ दिवसांत दाखल होणार असल्याचे मनपा आयुक्तांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय देखील सज्ज करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या :-