कोरोनाच संकट आयपीएलवर, तिकीटविक्रीवर बंदी ची शक्यता

मुंबई : पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य पातळीवर कोरोना व्हायरसबाबत जगजागृती केली जात आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख 10 हजारांवर पोहोचली आहे, याच पार्श्वभूमीवर हा विषाणू अधिक पसरू नये म्हणून राज्य सरकारने चांगलीच कंबर कसलेली आहे.

बीसीसीआयनं आयपीएलच्या सामन्यांचं मुंबईत आयोजन करावं, पण या सामन्यांची तिकीटविक्री करू नये, अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी आयपीएलचा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गर्दी करू नये म्हणून राज्य सरकारनं तिकीटविक्री करू न देण्याची सावध भूमिका घेतली आहे.

आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भातही बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो. मात्र तसं करणं कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर लक्षात घेत आयपीएलच्या तारखांची घोषणा केली जाते. त्यामुळे आयपीएलची तारीख मागे-पुढे होणे तुर्तास तरी शक्य वाटत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली तर आयपीएल स्पर्धा रद्द केली जाणार हे निश्चित आहे.