राज्यात अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस, देशात अग्रस्थान कायम

मुंबई : कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने पहिल्यापासून आघाडी घेतली आहे. यात आता राज्याने अडीच कोटींचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे राज्यात दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त आहे.

या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून टोपे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल यंत्रणेचे अभिनंदन! आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.’

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मधल्या काळात लस उपलब्धतेबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यावरही मात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याने लसीकरणात आघाडी घेतली आहे. २१ जून पासून १८ वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मोदी सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. त्यानंतर लसीकरणाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP