कोरोनाचा साईड इफेक्ट! संसर्गाच्या भीतीने उस्मानाबादच्या युवकाची आत्महत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बामणी गावातील एका २७ वर्षीय तरुणाने कोरोनाच्या भीतीने स्टेडियमच्या भिंतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आज मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या युवकाची कोरोना चाचणी अहवाल सोमवारी रात्रीच निगेटिव्ह आला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, बामणी येथील सुदर्शन सोमान सिरस हा दोन दिवसांपूर्वी पुण्याला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. आपल्याला कोरोनाचीच लागण झाली असावी, अशी भीती त्याला होती. तो उच्च शिक्षण घेत होता. त्याचबरोबर शहरातील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याची ट्रिटमेंट सुरू होती.

दरम्यान, सोमवारी रात्री सातच्या सुमारास तो मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचे आहे, असे सांगून जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून बाहेर पडला. यानंतर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मृतदेह तुळजाभवानी स्टेडियमच्या शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये आढळला. माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची ओळख पटवली. त्याने कोरोनाला भिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या