राज्यासाठी चिंताजनक बातमी : कोरोना वाढतोय, त्यामुळे सावधानी बाळगा – अजित पवार

ajit pawar

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ राज्य शासनाच्या आदेशांचे पालन करावे लागण्याची शक्यता आहे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असेही अजित पवार म्हणाले.

तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.