अनेक दिवसानंतर मिनी घाटीत कोरोना रुग्ण

औरंगाबाद : तब्बल दहा महिने कोविड सेवेला वाहिलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अलीकडेच नॉन-कोविड सेवा सुरू झाली असताना, करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यानंतर आता रुग्णालयामध्ये कोविड सेवेलाही प्रारंभ झाला आहे. जिल्हा रुग्णालयात सोमवारी चार बाधितांना दाखल करण्यात आले असून, सद्यस्थितीत कोविड व नॉन-कोविड सेवांबरोबरच लसीकरणही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण १५ मार्च रोजी शहरात आढळला होता व त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय हे राज्यातील पहिले ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून करोनाग्रस्तांच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर या ठिकाणी सर्व नॉन-कोविड सेवा खंडित होऊन केवळ कोविड सेवा सुरू झाल्या होत्या.

आणि जवळजवळ जानेवारीपर्यंत कोविड सेवा सुरू होत्या. दरम्यान, नोव्हेंबरनंतर बाधितांची संख्याच कमी झाल्यानंतर व सगळ्याच कोविड खाटा रिक्त राहू लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये अलीकडेच नॉन-कोविड सेवांना सुरुवात झाली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाग्रस्तांचे प्रमाण अचानक वाढू लागल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णालयात कोविड सेवांना प्रारंभ करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत रुग्णालयाचा सर्वांत वरचा म्हणजे रुग्णालयाचा दुसरा संपूर्ण मजला कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या ‘ए’ व ‘बी’ या दोन विंगमध्ये सोमवारी चार बाधित दाखल झाले आहेत, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

लवकरच ऑक्सिजन टँक

जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये येत्या दोन ते तीन आठवड्यांत जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीसी) एक कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून १३ किलोलिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक उभा राहणार आहे. त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. या लिक्विड ऑक्सिजनमुळे करोनाग्रस्तांसह संपूर्ण रुग्णालयातील रुग्णांना प्रभावी व पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रुग्णालयातील किमान २०० ते २२५ खाटांना या लिक्विड ऑक्सिजनचा लाभ होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या