पुण्यात कोरोनाचा उद्रेक, आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची भर

pune

पुणे : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात आज नव्याने ६ हजार ६७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख २९ हजार ६६१ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ६२८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ७१ हजार ४३७ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात २४ हजार ७७३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १७ लाख २१ हजार ७१४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५२ हजार ४७६ रुग्णांपैकी १,०१४ रुग्ण गंभीर तर ४,९५६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ७४८ इतकी झाली आहे.

दरम्यान बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलं आहे. लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला १ ते २ दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या