कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांवर आता ड्रोनची नजर

औरंगाबाद : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत,जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे पालन शहरातील अनेक नागरिक करतांना दिसत आहेत मात्र अजूनही काही टवाळखोर विनाकारण शहरात फेरफटका मारायला निघतातच हे लक्षात आल्याने आता शहरातील काही भागावर ड्रोनची नजर असणार आहे.

गुरवार (दि.०9) पासून या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील आझाद चौक, रोशन गेट आणि कटकट गेट या भागात पहिल्या दिवशी ड्रोनने नगर ठेवण्यात आली. विनाकारण फिरणारे, समूह करून काट्यावर बसणारे, पोलिसांची नजर चुकवून पळवाटांनी प्रवास करणारे तसेच रात्री उशिरा घराबाहेर पडणारे आशा सगळ्यानवर आता ड्रोन द्वारे नजर ठेवून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

दरम्यान शहरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. शुक्रवारी या संख्येत एका रुग्णाची भर पडली असून ४९ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह शहरात एकूण १८ रुग्ण झाले आहेत. तर यातील एकाचा मृत्यू झाला आहे व एक रुग्ण या संकटातून सावरला आहे. इतर १५ जणांवर जिल्हा रुग्णालयात तर एका ७ वर्षीय बालिकेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच ७२ संशयितांचे अहवाल मिळण्याची वाट बघितली जात आहे.