जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण

जालना : जालना जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासा सुरुवात झाली आहे. शनिवारी जिल्हाभरात ७० नवे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यूही झाला. दरम्यान, २१ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १४,४३२ वर पोहोचली आहे. यापैकी १३ हजार ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३८७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २९६ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.

शनिवारी आढळले नवे रुग्ण
जालना ४४, नागेवाडी १, मंठा तालुक्यातील किराळा १, परतूर ९, घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी १, गुरुपिंप्री १, अंबड २, हस्तपोखरी १, जाफराबाद १, भोकरदन १, बरंजळा लोखंडे १, चोऱ्हाळा २, जाळीचा देव १ तसेच बुलडाणा ३, चेंबूर (मुंबई) १ अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६९, तर अँटिजनमधून १ असे ७० अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भोकरदनमधील एक संपूर्ण गाव सील
भोकरदनमधील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे ४ दिवसांत ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले. शिवाय सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाची चार पथकेही तैनात करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जाळीचा देव येथे चक्रधर स्वामींचे जागृत स्थान आहे. त्यामुळे याठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून भक्त, अनुयायी दर्शनासाठी येतात. १५ दिवसांपूर्वी आश्रमातील एका महंतास कोरोनाची लागण झाली होती. धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तेथील अनुयायांच्या कोरोना चाचण्या केल्या त्यात २३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गावात बंद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या