#Corona : धारावी धोक्यात, आणखी 5 नवे कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाचं मुंबईची धाकधूक वाढवणारे वृत्त समोर आले आहे.  धारावीमध्ये आणखी  5 नवे रुग्ण आढळून आले आहेत.   आता या नवीन  रूग्णांंनंतर धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 25 गेली आहे.

सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी समाजाचे आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान, हे दोघेही राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं आयसोलेटेड करण्यात आलेले होते.

खरंतर राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानी मुंबईत आढळले आहेत. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

दरम्यान देशातील कोरोनाचा सर्वाधित प्रभाव महाराष्ट्र राज्यात असल्याचं पहायला मिळतं. आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या एक हजार पार गेली असून शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 1364 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 97 लोकांनी आपला जीव गमावला आहे.