ऑनलाईन शेतमालाच्या विक्रीतून शेतकरी गटाने दिले कोरोना लढ्याला बळ !

corona

नाशिक : कोरोनाची महामारी, पर्यावरणाचा असमतोल, रासायनिक खतांसह औषधांचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम यामुळे नागरिकांमध्ये विषमुक्त भाजीपाला आणि शेती उत्पादनाची मागणी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील शेतकरी सहकारी उत्पादक कंपनी संलग्न कृषीधन शेतकरी गटामार्फत नैसर्गिक शेतमाल आणि किराणा साहित्यासह जीवनावश्यक साहित्य ग्राहकांना घरपोच पोहचविण्यात येत आहे. रासायनिक खते आणि औषधांना फाटा देऊन पिकवलेला भाजीपाला नैसर्गिक आणि विषमुक्त असल्याने लोकप्रिय झाला आहे. सकस भाजीपाल्यामुळे कोरोना लढ्याला बळ मिळत असून दिंडोरी, पेठ, सुरगाण्यातील शेकडो आदिवासी कुशल-अकुशल युवक-युवतींना या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे हक्काचा रोजगार लाभला आहे. विशेष म्हणजे या उपक्रम राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा अधीक्षक अधिकारी संजीव पडवळ यांनी कौतुक केले आहे.

प्रशिक्षित कृषीधन शेतकऱ्यांच्या गटांद्वारे उत्पादित भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य इत्यादीच्या विक्रीसाठी मुबलक प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी “सात्विक कृषिधन” व “कृषीमार्ट” या शेतकऱ्यांच्या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील होतकरू, प्रामाणिक व जबाबदार युवक, युवतींना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात हजारो नागरिकांपर्यंत कृषीधन शेतकरी गटाच्या माध्यमातून साहित्य पोहोचवितांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या स्वच्छतेचा नियमावलीचे कटाक्षाने पालनसुद्धा होत असल्याने नागरिकांचा ओढा व विश्वासही वाढला आहे.

नाशिक तालुका दिंडोरी तालुक्यातील जवळपास १०० ते १५० शेतकऱ्यांना या

लॉकडाऊनमध्येही शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथील लोकांसाठी थेट सोसायटीद्वारे ऑर्डर घेऊन पोहचविल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, ग्लोव्हज हे नियम पाळले जातात. ऑर्डर देण्यासाठी एका सोसायटीच्या किमान ४०-५० ऑर्डर असल्यास एका गाडीतून २००-२५० कॉम्बो पाठविले जातात. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे भाजीपाला, फळे यांचे वेगवेगळे कॉम्बो बनवून थेट सोसायटीपर्यंत उपलब्ध केले जातात. आतापर्यंत सुमारे 200 टन भाजीपाला व फळे यांची विक्री व 50 टन द्राक्षांची विक्री करून उर्वरित ५-६ टन द्राक्षांपासून नैसर्गिक बेदाणे तयार करण्यात आले आहेत. यामुळे मध्यंतरीच्या काळात द्राक्षांना भाव कमी असल्याने चिंतेत असलेल्या काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्तव्यावरील पोलिस बांधवांना ताजी फळे व भाजीपाला देण्यात आला. गायी शेणाच्या गोवऱ्या, गोमुत्र, पंचगव्य यांची सुद्धा शहरातून चांगल्या प्रकारे मागणी वाढत आहे.

अशी नोंदवावी मागणी

कृषीधन या शेतकरी गटाच्या ब्रँड शॉप आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे भाजीपाला, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, नैसर्गिक व आरोग्यदायी किराणा जसे खांडसरी साखर, सेंद्रिय गुळ, गुळ पावडर, मसाले, नैसर्गिक व विषमुक्त धान्य, डाळी, लिंबू लोणचे, कोकम सरबत आदी वस्तूंची ऑर्डर ऑनलाईन www.satvikkrushidhan.com पोर्टलद्वारे घेतली जाते.

विषमुक्त व नैसर्गिक शेतीचे उद्दीष्ट

दिंडोरी येथे स्वामी समर्थ आध्यत्मिक केंद्र आणि या केंद्रामार्फत चालणारे नैसर्गिक शेतीचे काम सर्वांना परिचित आहे. या केंद्रालाच त्याला संलग्न कृषिधन शेतकरी सहकारी कंपनी आहे. ही कंपनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी असून सभासद, भागधारक व संचालक देखील शेतकरीच आहेत. हे सर्व शेतकरी आपल्या गाव, तालुका, जिल्हा देशभरातील कोणत्याही शेतकऱ्यांना एकत्र करून किंवा संपर्क साधून शेतमालाची खरेदी विक्री करतात. यासह शेतमालावर प्रक्रिया करून देखील विविध खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री करतात. या कंपनीमार्फत विषमुक्त भाजीपाल्यासह जीवनावश्यक किराणा साहित्यही घरपोच पुरविण्यात येत आहे. विषमुक्त व नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करण्याचे उद्दीष्ट आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील ५ ते ६ हजार शेतकरी या शेतकरी सहकारी कंपनीशी संलग्न आहेत.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

पुणे मुंबई सारख्या शहरामधील वेगवेगळ्या सोसायट्यामध्ये थेट शेतकरी ते ग्राहक अशा पध्दतीने भाजीपाला व फळे पॅकिंग करून विक्री केली जात आहेत. यामध्ये २० ते २५ प्रकारचा भाजीपाला व ७ ते ८ प्रकारच्या फळांचे कॉम्बो तयार करुन देण्यात येत आहेत. लॉकडाऊन काळात शेतकरी शेतात राबतोय कारण शहरातील आपले बांधव घरामध्ये लॉकडाऊन आहेत त्यांच्यापर्यंत हा शेतमाल पोहचविला जावा ही भावना असून त्यामध्ये कुठलाही व्यवसाय वाढविण्याचा विचार नसून, यामाध्यमातून देशकार्य घडावे व आपला बंधूभाव वाढीस लागवा या दृष्टीने शेतकरी एकत्र येवून काम करीत आहे.- योगेश पाटील समन्वयक कृषीधन शेतकरी गट, नाशिक

भाजपचा ‘हा’ दिग्गज नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात ?

नागपूरकरांना मोठा दिलासा : तुकाराम मुंढेंनी घेतला मोठा निर्णय…

हापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कोकणातून 5 हजार पेट्या रवाना