एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस

पुणे : मार्च महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने राज्यभरात हजेरी लावली. त्यानंतरही ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ- उतार होत होते. मात्र आता राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका असह्य होत असतानाचा विदर्भ, मराठवाड्यात आज पुन्हा पुर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका असह्य होत असतानाचा विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या अवकाळी सरी येऊ शकतात. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर गुरुवारी सकाळपर्यंत राज्यभरातील काही ठिकाणी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यात सोलापूर येथे ३९.६ अंश, अकोला येथे ३९.५, अमरावती आणि वर्धा येथे ३९.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली, परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे.

दरम्यान, मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत (ता. ५) विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.