कोरोना अलर्ट! बीडचा आकडा पुन्हा दीड हजारांवर

बीड: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. एकीकडे रुग्णांची वाढती रुग्णसंख्या तर दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा होत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा दीड हजारांवर पोहोचला, तर ३३४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात तीनशेपेक्षा अधिक तर अंबाजोगाई व शिरूर तालुक्यात दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील ४८३२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठवले होते. याचा अहवाल मंगळवारी दुपारी आला असून एकूण ४८३२ पैकी १४९९ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आलेत.

मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित बीड शहर व तालुक्यात आढळून आले. ही संख्या ३८१ एवढी आहे. बीडनंतर अंबाजोगाई तालुक्यात २१२ कोरोना बाधित आढळून आले. तर आष्टी ५८, धारूर ६८ , केज १५१ , गेवराई ११९, माजलगाव ६८, परळी १२६, पाटोदा ५९, शिरूर २०६, तर वडवणी तालुक्यात ५१ रुग्ण आढळून आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित केले. तर बीड शहरासह अंबाजोगाई, केज या तालुक्यात महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची अॅटिजन टेस्ट सुरू केली आहे. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांना चांगलाच आळा बसत आहे.

महत्वाच्या बातम्या