कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. मुंबईमध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालयही मंगळवारपासून बंद करण्यात येणार आहे. बीसीसीआयने कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करायला सांगितलं आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुढचे आदेश येईपर्यंत बीसीसीआयने क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमधली सगळ्यात मोठी लीग असलेली आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

एका बाजूला कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावार जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सुपर लीगमधून मायदेशात गेलेल्या न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलॅनघनला वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतोय.

कोरोनाची लागण झालेल्यांना रुग्णालयात वेगळं ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांपासूनही लांब राहावं लागत आहे. या कारणामुळे मॅकलॅनघनची पत्नी त्यांचं घर सोडून माहेरी गेली आहे.

मिचेल मॅकलॅनघनने ट्विट करुन त्याच्या बायकोने लिहिलेल्या नोटबद्दल सांगितलं. ‘वेगळं राहण्यासाठी सरळ घरी आलो आहे. पत्नीने लिहिलेली नोट आता पाहिली. आई-वडिलांसोबत राहण्यासाठी ती माहेरी गेली आहे. १४ दिवसांनंतर परत येईन, असं तिने लिहिलं आहे,’ असं ट्विट मॅकलॅनघनने केलं आहे.