fbpx

पोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी

टीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याने आज पालिकेच्या सभेला उपस्थिती लावली. यावेळी छिंदमच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छिंदम पालिकेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेक शिवप्रेमी पालिका परिसरात जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. यामुळेच पोलिसांनी छिंदमसाठी कडक सुरक्षा ठेवली होती.

छिंदमला सभागृहात मागच्या दारातून प्रवेश मिळाल्याने नगरसेवक संतापले. या वेळी शिवसेनेसह अन्य पक्षांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सभागृहनेते गणेश कवडे यांनी छिंदम याने सभागृहात पाऊल ठेवताच महाराजांची असलेली प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सभागृहामध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या एका गटाने प्रवेश करून निषेध नोंदवला. यावेळी सभा तहकूब करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

दरम्यान,आज महापालिकेची महासभा होती. त्यात छिंदम येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम अद्यापही नगरसेवक आहे. त्यामुळे त्याला सभेत येण्यापासून पोलीस अडवू शकत नव्हते. सभा सुरू होताच तो महापालिकेत आला. त्याने थेट पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांसमोर जाऊन एक अर्ज दिला. तो निघून गेल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू झाला. तो आलेल्या मार्गावर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली.

मराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले ?