सहकार चळवळ सुदृढ करण्यासाठी पाठबळ देणार – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई – राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात चांगल्या पद्धतीने चालवल्या गेलेल्या सहकारी संस्था मोठे योगदान देऊ शकतात . म्हणूनच सहकारी चळवळ सुदृढ करण्यासाठी आवश्यक ते पाठबळ राज्य सरकारकडून दिले जाईल , अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .

राज्य सहकारी संघाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते . राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल , सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील , मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते .

मुख्यमंत्री म्हणाले की , सहकारी क्षेत्राचे महत्व सध्याच्या काळातही टिकून आहे . तरुण वर्गाला रोजगार देण्याच्या कामात सहकारी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकते . त्यासाठी सहकारी संस्थांना काळाची पावले ओळखून व्यवसाय वाढीची धोरणे आखली पाहिजेत . ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आर्थिक दृष्ट्या सुदृढ झाल्या पाहिजेत .

शेती क्षेत्राच्या विकासासाठी भांडवल पुरविण्याची सुविधा या सेवा सोसायट्यांमार्फत उपलब्ध केली गेली आहे . आमचे सरकार सहकार चळवळीतील दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी कार्यरत आहे . मात्र त्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशी मंडळी सहकार चवळी मोडीत निघाल्याचा कांगावा करीत आहेत. सहकार चळवळ टीकायची असेल संस्कारित सहकार हा मंत्र या चळवळीत काम करणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे , असेही ते म्हणाले . मागील सरकारने सहकारी संस्थांना शिक्षण निधी देण्यास प्रतिबंध केला होता . ही तरतूद रद्द करण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले . सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य सहकारी संघाने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत , अशी अपेक्षा व्यक्त केली .