शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सहकार्य करा-लोणीकर

Babanrao-Lonikar

 जालना : शेगाव ते पंढरपूर हा पालखी महामार्ग 2 हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत आहे. जालना जिल्हयातून जवळपास 95 किलोमीटरचा हा महामार्ग जात असुन या मार्गामुळे दळणवळण सुलभ व जलदगतीने होण्याबरोबरच या भागातील विकासाचा चालना मिळून बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने या रस्त्याच्या कामाला सर्व शेतकऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

Loading...

परतूर येथील तहसिल कार्यालयात लोणार-मंठा व वाटूर-लोणी (शेगाव ते पंढरपूर) या पालखी मार्गाबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभियंता श्री देशमुख, पोलीस उपअधीक्षक श्री वाळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कोल्हे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंग, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री चव्हाण, तहसिलदार श्री फुफाटे आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गतकाळात अंबड येथे पंढरपूरला पांडूरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होऊन त्यामध्ये अनेक वारकरी मृत्युमुखी पडले होते. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता असुन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी व्हावी तसेच या घटनेमुळे जालना जिल्ह्याला लागलेला कलंक पुसण्यासाठी आपण सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन शेगाव ते पंढरपुर या 2 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याला मंजुरी मिळवुन घेतली. या रस्त्याचे कामही मोठ्या झपाट्याने सुरु आहे. जालना जिल्ह्यातून हा मार्ग जवळपास 95 किलोमीटर जाणार असुन परतूर व मंठा भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात या मार्गामुळे चालना मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, वारकऱ्यांची पढंरपूरला जाण्याची सोय व्हावी या दृष्टीकोनातुन या पालखी मार्गाचे काम करण्यात येत आहे. या पालखी मार्गामध्ये आवश्यकतेनुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात येणार आहेत अशा शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या दारानुसार योग्य मोबदला देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या संमतीनेच जागेचे संपादन करण्यात येणार आहे. विकासाचा चालना देणारा हा मार्ग असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्यात येऊ नये. या मार्गाच्या कामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या काही अडचणी असल्यास त्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन चर्चेच्या माध्यमातुन सोडविण्याचे आवाहन करत कोणही कायद्याचे उल्लघंन करु नये असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. मार्गासाठी संपादित केलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीमधील झाडे तोडण्यात आली असतील तसेच शेतीपंपाच्यापाईप लाईनचे नुकसान झाले असेल याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पहाणी करुन त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना अदा करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याला अशा प्रकारच्या बैठकांचे आयोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीच्या माध्यमातुन उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळपिके तसेच इतर मालाला या पालखी महामार्गामुळे बाजारपेठेत कमी वेळेत व कमी खर्चात नेण्याची मोठी सोय होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गामुळे उद्योगधंदे, व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पर्यायाने या भागातील बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात कामाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन मंठा व परतूर तालुका मागासलेला आहे. या शेगाव ते पंढरपूर या 2 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातुन मंजुरी मिळाली असुन या मार्गामुळे या भागात विकासाची गंगा आणल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या आभार व्यक्त करत या मार्गामध्ये येणाऱ्या बाह्यवळण व इतर कामांसाठी 68 एकर जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संमती तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या शेतजमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमीनीचा पाचपट भावाने मोबदला देण्यात येणार असुन या मार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.Loading…


Loading…

Loading...