fbpx

अग्निपरीक्षा : आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार कुमारस्वामी सरकार

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे, आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच.डी.कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर.रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असंही सांगितलं. याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मागे फिरण्याचा तसंच विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे. आमदारांचा हा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे.