अंगणवाडीच्या मुलांसाठी शौचालयात स्वयंपाक करणे गैर नाही, महिला व बाल विकास मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य

Anganwadi

टीम महाराष्ट्र देशा : मध्य प्रदेशाच्या महिला व बाल विकास मंत्री इम्रती देवी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. शौचालयामध्ये स्वयंपाक करायला हरकत नाही. फक्त शौचालयाचे आसन आणि जेवण तयार करण्यासाठी वापरणारी शेगडी यांच्यामध्ये अंतर असले पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मंत्री इम्रती देवींच्या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर टीकेची झोड उठली आहे.

मध्य प्रदेशच्या शिवपूर जिल्ह्यातील करैरा गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये स्वयंपाक घरामध्ये शौचालय बांधण्यात आले होते. तिथेच एलपीजी सिलिंडरचा वापर करुन शेगडीवर लहान मुलांसाठी अन्न शिजवले जात होते. जेवण तयार करण्यासाठी वापरली जाणारी भांडी शौचालयाच्या आसनावर ठेवली जात होती. जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा अंगणवाडी सेविकेने सांगितले की, ‘हे बरोबर आहे की इथे शौचालयाच्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो. पण स्वयंपाकासाठी दुसरी जागा द्या अशी मागणी मी अनेकदा केली होती.

सेविकांच्या या मागणीवर मंत्री इम्रती देवी यांना प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये काय चूक आहे, असे म्हणत इम्रती देवींनी शौचालयाच्या ठिकाणी स्वयंपाक करण्यास काहीच अडचण नाही, असे वक्तव्य केले आहे. जर शौचालयाचे आसन आणि स्टोव्ह यांच्यामध्ये अंतर असेल तर स्वयंपाक करण्यास काहीच समस्या नाही. त्यांनी पुढे असे सुध्दा सांगितले की, आजकाल घरामध्ये शौचालय- बाथरुम एकत्र असतात. जर आपल्या घरात अशा प्रकारचे शौचालय-बाथरुम एकत्र असेल आणि त्यावरुन जर आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरी जेवण करण्यास नकार दिला तर आपण काय बोलाल? असा सवाल त्यांनी विचारला आहे.