‘केवळ विवाहासाठी धर्म-परिवर्तन चुकीचं’; अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलं ‘जोधा-अकबर’चं उदाहरण

court

अलाहाबाद : देशात सध्या धर्म-परिवर्तनावरून चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘लव जिहाद’ संदर्भातील कायदा लागू करण्यात आला आहे. बेकायदेशीर धर्म परिवर्तन अध्यादेशाला नोव्हेंबर २०२० मध्ये मंजुरी देण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये लव जिहादच्या अनेक घटना न्यायालयात पोहोचल्या असून आता थेट अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘जोधा-अकबर’चं उदाहरण देत याबाबत भाष्य केलं आहे.

एका प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीवेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुघल बादशाह अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण देत, धर्म परिवर्तनापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. न्यायलायने टिप्पणी केली की अकबर-जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून धर्म परिवर्तनाच्या अनावाश्यक घटनांपासून वाचलं जाऊ शकतं. अकबर-जोधाबाईने धर्म परिवर्तन न करता विवाह केला. एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही, अशी टिपण्णी न्यायालयाने केली.

‘धर्म आस्थेचा विषय आहे, हा आपली जीवनशैली दर्शवतो. ईश्वराप्रती भाव प्रकट करण्यासाठी एखादी विशिष्ट पूजा पद्धतच असणे गरजेचे नाही. विवाह करण्यासाठी समान धर्माचं असणं देखील आवश्यक नाही. अशावेळी केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

या प्रकरणी निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले, ‘अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनात धर्माबद्दल विशेष आस्था नसते. हा निर्णय केवळ दबाव, भीती व लालसेपोटी घेतला जातो. केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन चुकीचं आहे, याला काही घटनात्मक मान्यता नसते. वैयक्तिक फायद्यासाठी केले गेलेले धर्म परिवर्तन, केवळ वैयक्तिक नुकसानच करत नाही तर, ते देश व समाजासाठी देखील घातक असते. अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते आणि विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन मिळते.’

महत्त्वाच्या बातम्या