कैद्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

महिन्यातून एकदा दहा मिनिटांसाठी कुटुंबीयांना कैद्याशी बोलता येईल.

टीम महाराष्ट्र देशा: तुरुंगात असलेल्या कैद्यांना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुरुंगात असलेल्या कैद्यांना आता थेट आपल्या परिवारासोबत सहज बोलता येणार आहे. याबाबतच वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ ने दिले आहे.

मुंबईतील तुरुंगांमध्ये कैद्यांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काही कैद्यांना येरवडा व औरंगाबाद येथील तुरुंगांमध्ये पाठवावं लागतं . दूरच्या अंतरामुळे कैद्यांचे परिवार त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकत नाहीत आणि यामुळेच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा सुरु करण्यात आली आहे. दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांनाच फक्त व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलता येईल, म्हणजेच अंडर ट्रायल कैद्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) राजवर्धन सिन्हा यांनी दिली आहे.

महिन्यातून फक्त एकदाच दहा मिनिटांसाठी कुटुंबीयांना कैद्याशी बोलता येईल. यासाठी त्यांना जवळच्या जेलशी संपर्क साधावा लागेल. जेलमध्ये असलेल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर जिल्हा कोर्टाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुममध्ये नेण्यात येईल.विशेष म्हणजे यासाठी कुटुंबीयांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही .

You might also like
Comments
Loading...