उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत वादंग, एबीव्हीपीने केला दडपशाहीचा आरोप

amrawati

अमरावती : अमरावती दौर्‍यावर आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकी दिल्याचा आरोप ठेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय आठ कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, अभाविपने सत्ताधारी आणि पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मंगळवारी अमरावती दौर्‍यावर आले होते. या दौर्‍या दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळपासूनच स्थानबद्ध केले. यात महानगरमंत्री सौरभ लांडगे, चिन्मय भागवत, श्रेयस देशमुख यांचेसह एकूण 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना राजापेठ, कोतवाली, गाडगेनगर पोलिस ठाण्यात ठेवले होते. परंतु, उदय सामंत यांना नागपुरवरून अमरावती येथे येवू देणार नाही, अशी धमकी अभाविपचे विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे यांनी दिल्याचा आरोप ठेवून फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

रात्री नऊ पर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कलम व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दरम्यान, अभाविपने या घटनेचा निषेध नोंदविला आहे. प्रवेश शुल्कात 30 टक्के कपात करण्यात यावी, वार्षिक शुल्क भरण्यास चार टप्पे देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अभाविपचे शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटणार होते. यासाठी त्यांना वेळ मागितली होती. चर्चेतून हा प्रश्न मांडल्या जाणार होता.

परंतु, वेळ तर मिळालीच नाही उलट दडपशाही केल्याचा आरोप अभाविपने केला आहे. धमकीमुळे गुन्हा,अटक अभाविप प्रांत मंत्री रवी दांडगे यांनी मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक यांना फोन करून सामंत यांना अमरावती येथे येवू देणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे दांडगे यांच्यावर प्रतिबंधात्मक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याचे फ्रेजरपुरा ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.

कार्यकर्ते ठाण्यावर जमले, रवी दांडगे यांच्यावरील कारवाईनंतर अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यावर धडकले होते. दांडगे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

महत्वाच्या बातम्या:-