सरकार विरोधात डाकसेवकांचा एल्गार, बेमुदत संप सुरू

blank

टीम महाराष्ट्र देशा- शेतकरी,युवक,महिला,जेष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असलेल्या सरकार विरोधात आता डाकसेवकांनी एल्गार पुकारला आहे. आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार (दि.२२) पासून बेमुदत संप पुकारला आहे. भारतीय डाक कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली भारतीय खातेबाह्य कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपाची दखल घेऊन लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बापू दडस यांनी केली आहे.

ग्रामीण डाकसेवकांच्या वेतन व सेवा शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कमलेशचंद्र यांच्या समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील डाकसेवक सोमवारपासून संपावर गेले आहेत. संपाला आठवडा उलटल्यानंतरही त्यामध्ये कोणताही तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही.

कमलेशचंद्र यांच्या समितीने मे २०१७ आपला अहवाल सादर केला होता. डाकसेवकांना सध्या मिळणाऱ्या  चार ते पाच हजारांच्या वेतनामध्ये वाढ करून त्यांचे वेतन १० ते १४ हजार करावे, नोकरीत कायम करावे, यासह विविध शिफारसी समितीने केल्या आहेत.डाकसेवकच संपावर गेल्यामुळे डाकसेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे डाकविषयक व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामीण भागात विविध कामे डाकघरातून केली जातात. ती पुरती प्रभावित झाल्याची माहिती आहे. संपामध्ये राज्यातील सुमारे १७ हजार ग्रामीण डाकसेवकांचा समावेश असल्याने त्याचा फटका पोस्टाच्या कामकाजाला बसत आहे.