…हे पाहून नथुरामलाही आनंद झाला असेल; भाजपच्या मंत्र्याने मिसळला साध्वीच्या सुरात सूर

टीम महाराष्ट्र देशा- महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर भाजपानं त्यांना माफी मागण्याची सूचना केली. यानंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली. मात्र हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं आहे.

सात दशकानंतर सध्याची पिढी एका बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसेबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून गोडसेलाही आनंद झाला असेल, असे त्यांनी सांगितले. आता वेळ आली आहे की आपण माफी मागणे सोडून पुढे गेले पाहिजे, आता नाही तर मग कधी?, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनंत कुमार हेगडे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहेत. मोदी सरकार सत्तेत येताच संविधान बदलणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे ते चर्चेत आले. यानंतर त्यांनी सतत वादग्रस्त विधानं केली. आता अनंत कुमार यांनी थेट साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य अभिनेता कमल हसनने केले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल असं विधान केले होते.

भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल असे म्हटले होते.

त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं म्हटलं आहे. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे