मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरूध्द न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल

अहमदनगर : नगर शहरात न्यायालयाच्या आदेशानुसार पाडलेली धार्मिक स्थळे पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करून न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी महापालिकेने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,गिरीश जाधव,शहर सचिव नितीन भुतारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उच्च न्यायालयाचा आदेश तसेच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने सर्वेक्षण करून शहरातील काही दार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई सुरू केली होती.

या कारवाई मध्ये महापालिकेने नगर-कल्याण रस्त्यावर शिवाजीनगर परिसरातील लक्ष्मीदेवीचे मंदिर पाडण्याची कारवाई केली होती. मात्र कारवाईने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदरचे लक्ष्मीदेवीचे पाडलेल्या मंदिराच्या जागेवरच पुन्हा नव्याने बांधकाम सुरू करून मंदिर पुन्हा बांधण्यास सुरूवात केली होती.या बाबतची माहिती मिळताच प्रभारी आयुक्त भानुदास पालवे यांनी तातडीने संबंधितांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे यांनी पाहाणी करून मंदिराचे बांधकाम पुन्हा करून न्यायालयाचा अवमान झाला असल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता. मात्र प्रशासनाकडून पोलीसात फिर्याद देण्याची टाळाटाळ केली जात होती.मात्र अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी तातडीने संबंधित अधिका-यांना बोलावून चांगलेच फटकारले. त्यावेळी फिर्याद नेमकी कोणी द्यावी या बाबत चर्चा होऊन अखेरीस प्रभाग अधिकारी यांची जबाबदारी असल्याचे निश्चित करून त्यांना फिर्याद देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.