नळाला दुषित पाणी येते, संतप्त नागरिकांची थेट मनपा आयुक्तांविरोधातच पोलिसात तक्रार!

औरंगाबाद: शहरातील पहाडसिंगपुरा परिसरातील जुन्या भागात अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. याबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली , तक्रारी केल्या मात्र काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी चक्क महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याविरोधातच तक्रार दाखल केली आहे. मनपा प्रशासकांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे शहरात याविषयी एकच चर्चा होतांना दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे पहाडसिंगपुरा येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तेथील नागरिकांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्याचबरोबर या दूषित पाण्यामुळे रोगराई वाढेल व नागरिकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले.

अनेक वेळा मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील त्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाही. शेवटी त्रस्त झालेल्या नागरीकांनी अखेर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पाणीपुरवठा अभियंता, उपअभियंता यांच्या विरोधात स्थानिक बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज केला आहे. आता यावर पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या