प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव सत्याग्रह

शरद पवार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक व संविधानप्रेमी यांच्यातर्फे संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

संविधान मोर्चाला राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, जदयूचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, गणेश देवी, बी जी कोळसे पाटील, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, यांच्यासह विविध पक्षातील नेते हजेरी लावणार आहेत. तसेच काँग्रेसचे नेतेही यात सहभागी होणार असून मुंबईत मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून ते गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

संविधान मोर्चा बाबत आमदार जिंतेद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नाही. हा फक्त संविधानावर प्रेम करणा-या व्यक्तीचा मोर्चा असेल. यात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील फक्त २५० व्यक्तींना प्रवेश असेल तर आयआयटीतील विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना या लाँग मोर्चात प्रवेश असेल. तसेच या मोर्चाचे कोणीही नेतृत्त्व करणार नाही. देशात भाजपचे सरकार असून, या सरकारमधील एक मंत्री आम्ही या देशाचे संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो आहे असे म्हणतो. या शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी संविधानप्रेमी हा संविधान बचाव सत्याग्रह मोर्चा काढत आहोत असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.