वैजापूरवासीयांना दिलासा! लवकरच २०० लिटर प्रति तास क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होणार सुरु

वैजापूर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयात २०० लिटर प्रति तास क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यास सरकारने मान्यता दिली असुन यासाठी एक पथक रुग्णालयास लवकरच भेट देऊन निरीक्षण अहवाल सादर करणार आहे. या प्रकल्पामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी औरंगाबाद किंवा अन्य जिल्ह्याच्या ठिकाणावर अवलंबुन रहावे लागणार नाही अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी दिली.

डॉ.परदेशी यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या वैजापूर दौऱ्याच्या वेळी कोविड रुग्णालयात प्रतिबंधक लस व ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी कोविड सेंटर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या दिवंगत मीनाताई ठाकरे कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला होता. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कोविड सेंटरमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवारण केले.

यावेळी डॉ. परदेशी यांनी प्रतिबंधक लस व ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता करण्यावर जोर दिला. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ऐवजी उपजिल्हा रुग्णालयातच निर्मिती प्रकल्प उभारण्यावर अनुकुलता दर्शवल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले. या प्रकल्पातुन प्रति तास २०० लिटर ऑक्सिजन निर्माण करण्यात येईल. प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन विकास महामंडळाचा निधी वापरण्यात येणार असुन येत्या काही दिवसात एक पथक भेट देऊन पाहणी करणार आहे असे ते म्हणाले.

वैजापुरच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करणार असल्याचे सुतोवाच केले होते. ऑक्सिजनचे छोटे सिलिंडर ७४० लिटर व मोठे सिलिंडर १३०० ते १५०० लिटरचे असते. मात्र दररोज किती रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते यावर सिलिंडरची आवश्यकता अवलंबुन आहे.

वैजापुरच्या रुग्णालयात आतापर्यंत कधी सहा तर कधी सहा पेक्षा अधिक सिलिंडरची गरज भासली होती. रुग्णाला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागल्यास जास्त सिलिंडर लागतात असे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गजानन टारपे यांनी सांगितले. दरम्यान नियोजित ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता प्रति तास २०० लिटर असणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या