रुग्णांना दिलासा, गरवारे कंपनीच्या शेडमध्ये दीडशे ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर होणार सुरु!

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. रुग्ण संख्येत कमी जास्त प्रमाणात फरक पडत असला तरीही रुग्ण संख्येचा कधीही विस्फोट होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका सतर्क झाली असून विविध ठिकाणी कोविड केअर सेंटरसाठी जागेची पाहणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिकलठाणा येथील गरवारे कंपनीच्या सोयीसुविधा युक्त असलेल्या कंपनीच्या शेडमध्ये कंपनीच्या वतीने शंभर ते दीडशे ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु करून देण्यात येणार आहे. या कोविड सेंटरच्या जागेची पाहणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी (दि.३) केली.

चिकलठाणा येथे गरवारे पॉलिस्टर कंपनीच्यावतीने कंपनीच्या शेडमध्ये ऑक्सीजन सह लवकरच शंभर ते दीडशे ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोविड सेंटरसाठी गरवारे कंपनीचे शेड अतिशय चांगले असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले. जागेची पाहणी केल्यानंतर यावेळी त्यांनी काही सूचना ही दिल्या. यावेळी उद्योगपती उल्हास गवळी, महानगरपालिकेचे शहर अभियंता एस.डी.पानझडे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर १५ एप्रिल पासून ते १ मे दरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्यात आले. असे असतांनाही औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पाहिला तर कडक निर्बंध नसतांनाचे पंधरा दिवस आणि निर्बंध काळातील पंधरा दिवस परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या देखील वाढली आहे यामुळे काळजी घेण्याची गरज आहेच. शिवाय निर्बंधांचा विशेष फायदा झालेला दिसत नाही. त्याचमुळे आता औरंगाबाद मनपाने कोविड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या