औरंगाबादकरांना दिलासा, मनपाचा पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास राहणार कार्यान्वित

औरंगाबाद : पावसाळ्यात दरवर्षी शहरात पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे, नाल्यांना पूर येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेने पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू केला असून, त्यात तब्बल १५५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी चोवीस तास नियंत्रण कक्षामार्फत देखरेख करणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महापालिकेने मॉन्सूनपुर्व तयारीअंतर्गत शहरात नाले सफाईची कामे सुमारे ७० ते ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. तसेच नालेसफाई कामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे याची काळजी घ्या, पावसाळ्यात कोणाची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने व्यवस्थित नालेसफाईचे काम करा, अशा सूचना सर्व वाॅर्ड अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या. तसेच शहरातील नाल्यावर असलेल्या इमारतींच्या खालील नाल्याची साफसफाई करून संबंधितांना नाला सफाईच्या कामाचे बिल देऊन ते वसूल करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकतीच बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शाखा अभियंता डी. जी. निकम यांच्या नियंत्रणाखाली २४ तास पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी महापालिकेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP