केंद्र सरकारकडून सातत्याने तपास यंत्रणांचा गैरवापर- शरद पवार

sharad pawar

मुंबई : आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने टाकतंय. त्यात सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. या सगळ्या एजन्सींचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते. त्यांनी हे आरोप मलाही सांगितले होते. परंतु या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आता कुठे आहेत, याचा पत्ता लागलेला दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत बेछूट आरोप करतो, हे चित्र कधी घडलं नव्हतं. अनिल देशमुखांनी यावर सत्तेपासून बाजूला होण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ गायब झाले हा फरक आहे.

दरम्यान, ‘अनिल देशमुखांच्या बाबतीत नंतर चौकशी करण्याचे काम सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा घातला. मला या एजन्सीचे कौतुक वाटते की त्याच घरात पाच वेळा जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळत माहीत नाही. पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच वेळा एखाद्याच्या घरी जाणं हे कितपत योग्य आह, याविषयीचा विचार करण्याची वेळ आली आहे. यावर जनमत व्यक्त होण्याची गरज आहे’, असेही यावेळी पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या